Sri Guru Nrusimha Saraswati Swamy Ashtakam in Marati with Lyrics ,meaning , video श्रीमन नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराज यांचे स्तोत् |



      श्री सरस्वती गंगाधर रचित श्रीमन नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराज यांचे स्तोत्




सार्थ धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे चतुर्तिध पुरूषार्थ देणारे श्री सरस्वती गंगाधर रचित श्रीमन नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराज यांचे स्तोत्

इन्दुकोटितेज करुण-सिन्धु भक्तवत्सलं ।
नन्दनात्रिसूनु  दत्त, इंदिराक्ष श्रीगुरुम्  ॥
गंधमाल्य अक्षतादि - वृंददेववंदितं ।
वंदयामि  नारसिंह - सरस्वतीश पाहि माम्  ॥१॥

अर्थ: ज्याचे तेज किंवा ज्याचा सौम्य प्रकाश हा कोटयावधी चंद्रासारखा आहे, जो दयेचा सागर आहे. जो भक्तांवर प्रेम करणारा आहे. जो आनंद देणारा आहे. जो अत्रिमहर्षींचा पुत्र आहे. ज्याचे नाव श्रीदत्त आहे. ज्याचे डोळे नलिकमलाप्रमाणे सुंदर असून सर्व हस्तपादादी इंद्रिये शोभिवंत व कांतिमान आहेत. जो सर्वांच्या गुरूस्थानी आहे. आणि जो गंध, पुष्प, व अक्षतांनी सर्व देवतांकडून पूजिला व नमस्कारिला किंवा वंदिला गेला आहे. अर्थात ज्याला गंधपुष्प अक्षदादि सर्व देव नेहमी वंदन करतात अशा श्रीमान नृसिंहसरस्वती यातिवर्यांना मी वंदन करतो व त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की, हे श्री गुरूदेवा ! आपण माझे रक्षण करा.

मायपाश - अंधकारछायदूरभास्करं ।
आयताक्ष  पाहि श्रियावल्लभेश – नायकम्  ॥
सेव्य – भक्तवृंद  वरद, भूयो-भूयोनमांम्यहं ।
वंदयामि  नारसिंह - सरस्वतीश पाहि माम् ॥२॥

अर्थ: जो मायापाशरूप अंधकाराला दूर करणारा सूर्य आहे. ज्याचे डोळे कमळाच्या पाकळीप्रमाणे रूंद व सुंदर आहेत, जो  लक्ष्मीला आवडणारा आहे. जो सर्व नियामक व सर्व नियंता आहे, जो सर्वांना सेवनीय म्हणजे सर्वजण ज्याची सेवा करतात असा आहे, आणि जो भक्तगणांचा वरदाता म्हणजे आपल्या भक्तांचे अपेक्षित पुरविणारा अर्थात सर्व भक्तांच्या मनोवांच्छा किंवा इच्छा परिपूर्ण करणारा आहे. अशा श्रीमन नृसिंह सरस्वती यतिवर्यांना मी वंद्न करतो व त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की हे श्री गुरूदेवा ! आपण माझे रक्षण करा.

चित्तजादिवर्गषट्क – मत्त वारणांकुशम् ।
तत्वसारशोभितात्मदत्त श्रियावल्लभम्  ॥
उत्तमावतार भूत-कर्तृ भक्तवत्सलं ।
वंदयामि  नारसिंह - सरस्वतीश पाहि माम् ॥३॥

अर्थ: जो मनापासून उत्पन्न होणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या सहा विकार रूपी उन्मत्त हत्तींना ताब्यात ठेवणारा अंकुश आहे. ज्याच्यामुळे तत्वमसि, अहं ब्रम्हास्मि, प्रजानंब्रम्ह, अयमात्मा ब्रम्ह या चार महावाक्यांच्या तात्पर्याला शोभा आहे. जो सर्व व्यापक आहे, जो लक्ष्मीचा आवडता आहे, जो सर्वश्रेष्ठ असा अवतारी पुरूष आहे. जो पंचमहा भूतांचा कर्ता आहे आणि जो भक्तप्रिय अर्थात भक्तवत्सल आहे अशा श्रीमन नृसिंहसरस्वती यति वर्यांना मी वंदन करतो व त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की हे श्रीगुरूदेवा ! आपण माझे रक्षण करा.

व्योमरापवायुतेज – भूमिकर्तुमीश्वरम्  ।
कामक्रोधमोहरहित सोमसूर्य-लोचनम्  ॥
कामितार्थदातृ भक्त – कामधेनु श्रीगुरूम्  । 
वंदयामि  नारसिंह - सरस्वतीश पाहि माम् ॥४॥

अर्थ: जो आकाश, पाणी, वायू, अग्नी आणि भूमी यांना उत्पन्न करणारा, व त्यांचे नियमन करणारा आहे, जो काम, क्रोध, मोह यां विरहीत असा परब्रम्ह स्वरूप आहे, ज्याचे चन्द्र व सूर्य हे नेत्र आहेत आणि जो कामधेनु प्रमाणे भक्तांच्या सर्व इच्छा पुर्ण करणारा असा श्रीसदगुरू आहे अशा श्रीमन नृसिंह सरस्वतीयतिवर्यांना मी वंदन करतो व त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की, हे श्री गुरूदेवा ! आपण माझे रक्षण करावे.

पुंडरीक  – आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम्  ।
चंडदुरितखंडनार्थ  दंडधारि श्रीगुरुम्  ॥
मंडलीकमैलि – मार्तंड - भासिताननं ।
वंदयामि  नारसिंह - सरस्वतीश पाहि माम् ॥५॥

अर्थ: ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे विशाल आहेत, ज्याच्या कानातील कुंडलेही चंद्राप्रमाणे चकाकत असतात, ज्याने भक्तावरिल भयंकर संकटे मोडून काढण्यासाठी हातात दण्ड धारण केला आहे. ज्याचे मस्तक वर्तुळाकार जटांनी सुशोभित आहे ज्याचे मुखमण्डल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. अशा श्रीमन नृसिंह सरस्वती यति वर्यांना मी वंदन करतो व अशी प्रार्थना करतो की हे श्री गुरूदेवा ! आपण माझे रक्षण करा.

वेदशास्त्रास्तुत्यपाद, आदिमूर्ति श्रीगुरुम्  ।
नादबिंदुकलातीत, कल्पपादसेव्ययम्  ॥
सेव्यभक्तवृंदवरद भूयो भूयो नमाम्यहम्  ।
वंदयामि  नारसिंह - सरस्वतीश पाहि माम् ॥६॥

अर्थ: ज्यांच्या चरण कमलांची स्तुतीस्तोत्रे वेद व शास्त्रे अखण्ड गातात, जो आरंभीची श्रीगुरूमूर्ती म्हणजे जो श्रीगुरूंचा आद्यावतार किंवा सर्व श्रीगुरूंचा श्रीगुरू आहे. जो अनाहतनाद, बिन्दु व कला या सर्वांच्या पलीकडला आहे, जो कल्पतरूप्रमाणे सेवनीय म्हणजे कल्पतरूप्रमाणे ज्यांची अखण्ड सेवा करणे हेच योग्य आहे, जो सेवा करणाऱ्या आपल्या भक्तगणाना वर देणारा आहे आणि ज्याला माझ्यासारख्या भक्ताने वारंवार नमस्कार करणे योग्य असल्यामुळे अशा श्रीमन नृसिंह सरस्वती यतिवर्यांना मी वंदन करतो व त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की, हे श्रीगुरूदेवा ! आपण माझे रक्षण करा.

अष्टयोगतत्वनिष्ठ, तुष्ट ज्ञानवारिधिम्  ।
कृष्णावेणितीरवास - पंचनदी - संगमम्  ॥
कष्टदैन्यदूरिभक्त – तुष्ट्काम्यदायकम्  ।
वंदयामि  नारसिंह - सरस्वतीश पाहि माम् ॥७॥

अर्थ: जो अष्टांग योग संपन्न असून त्या योगाच्या तत्वामध्ये स्थिर आहे, जो सदासर्वदा संतुष्ट व आनंदी असतो, जो जानाचा सागर आहे, जो कृष्णानदी तीरावर व पंचनद्यांच्या संगमावर निवास करतो, जो आपल्या भक्तांचे सर्व कष्ट, दारिद्रय व दीनत्व दूर करतो आणि त्यांच्यावर संतुष्ट होऊन त्यानी इच्छिलेले किंवा त्यांना हवे असलेले सर्व देतो अशा श्रीमन नृसिंहसरस्वती यतिवर्यांना मी वंदन करतो व त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की, हे श्रीगुरूदेवा ! आपण माझे रक्षण करा.

नारसिंहसरस्वतीश्च – नाम अष्ट्मौक्तिकम्  ।
हारकृत शारदेन गंगाधर – आत्मजम्  ॥
धारणीक – देवदीक्ष गुरूमूर्तितोषितम्  ।
परमात्मानंदश्रियापुत्र - पौत्रदायकम्  ॥८॥

अर्थ: नरसिंहसरस्वती ही आठ अक्षरे म्हणजे गंगाधराच्या सरस्वती नामक पुत्राला निमित्त करून श्री शारदादेवीने तयार केलेला आठ मोत्यांचा हारच होय. जे हा स्तोत्ररूप हार धारण करून अर्थात नित्य प्रेमाने म्हणून श्री गुरूमूर्तीला संतुष्ट करतात त्यांच्यावर परमात्मा संतुष्ट होऊन त्यांना श्रेष्ठ असा आत्मानंद मिळतो. या स्तोत्राच्या नित्य पठणामुळे श्रीगुरूमूर्ती संतुष्ट होऊन ते त्यांना ऎश्वर्य, संपत्ती, पुत्र व पौत्रादी देऊन आनन्दित करतात.

नारसिंहसरस्वतीय अष्टकं च य: पठेत्  ।
घोरसंसारसिन्धु - तारणाख्यसाधनम्  ॥
सारज्ञानदीर्घ आयुरारोग्यादिसंपदम्  ।
चारूवर्गकाम्यलाभ वारंवार यज्जपेत्  ॥९॥

अर्थ: श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे हे अष्ट्क जो नित्य नियमाने पठण करील त्याला हे स्तोत्र अत्यंत घोर अशा संसार सागरातून तरून जाण्याचे साधन होईल. त्याला सार रूप जान अर्थात आत्मजान, दीर्घायुष्य, आरोग्य, संपत्ती इ. सर्व मिळेल. या स्तोत्राचे पठण जो दररोज व सदैव नियमाने करतो, त्याला धर्म, अर्थ, काम व मोक्ष, या चतुर्विध पुरूषार्थांचा लाभ आपल्या अपेक्षेप्रमाणे होतो व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

॥ अशा रितीने श्रीसरस्वति गंगाधरांनी रचलेले श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे स्तोत्र अष्टक पूर्ण झाले 

Related Posts

Sri Guru Nrusimha Saraswati Swamy Ashtakam in Marati with Lyrics ,meaning , video श्रीमन नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराज यांचे स्तोत् |
4/ 5
Oleh

Subscribe via email

Like the post above? Please subscribe to the latest posts directly via email.

Powered by Blogger.